नो नेटवर्क भागातील नागरिकांसाठी मनपाचा विशेष कॅम्प; मिसारवाडीत नळ कनेक्शनची प्रक्रिया सुरू

मालमत्ता कर भरल्यानंतर मिळणार नवीन पाणी योजनेतून नळ कनेक्शन; आयुक्त अमोल येडगे यांचे आवाहन

नो नेटवर्क भागातील नागरिकांसाठी मनपाचा विशेष कॅम्प; मिसारवाडीत नळ कनेक्शनची प्रक्रिया सुरू
नो नेटवर्क भागातील नागरिकांसाठी मनपाचा विशेष कॅम्प; मिसारवाडीत नळ कनेक्शनची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :- शहरातील ‘नो नेटवर्क एरिया’मधील नागरिकांना नवीन पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मिसारवाडी येथे नागरिकांच्या सोयीसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला असून, नळ कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि मालमत्ता कराबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.

मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे. आयुक्त येडगे यांनी मिसारवाडी येथील कॅम्पला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नो नेटवर्क भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती पोहोचवून नवीन पाणी योजनेतून नळ कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेच्या मालमत्ता कराच्या जाळ्यात असलेल्या मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कर भरल्यानंतर नळ कनेक्शन घेता येणार आहे. ज्या मालमत्तांवर अद्याप कर आकारणी झालेली नाही, अशा मालमत्तांचे कर निर्धारण करून कराचा भरणा घेतल्यानंतर नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

कॅम्पच्या पहिल्याच दिवशी १६ मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली, तर त्यांच्या मालमत्तांवर कर आकारणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याशिवाय यापूर्वी कर आकारणी झालेल्या ३० मालमत्ताधारकांना थकीत कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कराचा भरणा झाल्यानंतर संबंधित मालमत्तांना नवीन पाणी योजनेतून नळ कनेक्शन देण्यात येणार आहे.

मिसारवाडी येथील हा विशेष कॅम्प शनिवार आणि रविवार असे आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह कॅम्पमध्ये उपस्थित राहून नळ कनेक्शनची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.