धक्का देऊन मोबाईल चोरीचा डाव फसला! जवाहरनगर पोलिसांचा दणका; झारखंडच्या 2 चोरांना बेड्या, ₹65 हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- सिग्मा हॉस्पिटल परिसरातील दर्गा रोडवर भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकाला धक्का देऊन त्याच्या खिशातील महागडा मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या मोबाईलसह एकूण ६५ हजार रुपये किमतीचे तीन महागडे मोबाईल जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता राजेश रामराव सानप हे सिग्मा हॉस्पिटलजवळील दर्गा रोड परिसरात भाजीपाला खरेदी करत होते. त्यावेळी दोन व्यक्तींनी जाणूनबुजून त्यांना धक्का देत त्यांचे लक्ष विचलित केले. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील २४,९९९ रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेण्यात आला.
या घटनेनंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५८/२०२६, कलम ३०३(२), ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच बिट मार्शलचे पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि राजेंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयित दर्गा चौक परिसरात फिरत असल्याचे समोर आले. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी दर्गा चौक परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून दोघांना पकडले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे शेख फय्याज शेख असलम (वय २१, रा. महाराजपूर, मोतीझरणा, ता. तेलझरी, जि. साहेबगंज, झारखंड) आणि नकसुद आलम इदवाह आलम (वय २०, रा. महुचौक, ता. जि. कठियाल, बिहार) अशी आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडील मोबाईलबाबत चौकशी केली असता समाधानकारक माहिती न मिळाल्याने अधिक तपास करण्यात आला. चौकशीत आरोपींनी सिग्मा हॉस्पिटलजवळ भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त मुद्देमाल :
विवो कंपनीचा मोबाईल – ₹२४,९९९
ओपो A3 कंपनीचा मोबाईल – ₹२०,०००
पोको कंपनीचा मोबाईल – ₹२०,०००
एकूण किंमत – ₹६५,०००
या कारवाईमुळे जवाहरनगर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नवतुरे, पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि राजु शिंदे यांनी केला.