दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! १२ वर्षांनंतर शिष्यवृत्तीत भरीव वाढ; शिक्षणाचा मार्ग झाला अधिक सुलभ
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :- मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली आणि मंत्री Atul Save यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल १२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यात आली असून, शिक्षणाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर झाला आहे.
उच्च शिक्षण घेताना शिक्षण शुल्क, प्रवेश शुल्क, नोंदणी, ग्रंथालय आणि वैद्यकीय तपासणी अशा विविध खर्चांमुळे अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक होतकरू विद्यार्थी मधेच शिक्षण सोडण्यास भाग पडत होते. मात्र, नव्या निर्णयामुळे या सर्व खर्चांचा समावेश थेट शिष्यवृत्तीत करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवासी विद्यार्थ्यांना दरमहा ₹१,७०० तर अनिवासी विद्यार्थ्यांना ₹९०० इतके सहाय्य देण्यात येणार आहे. अभ्यास दौऱ्यासाठी ₹१,५०० आणि थिसिस व पुस्तकांसाठी ₹१,८०० अशी अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नसल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
हा निर्णय केवळ शिष्यवृत्ती वाढ नसून, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा आणि त्यांना स्वावलंबनाकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून संधी निर्माण करून दिव्यांगांना सक्षम करण्याचा सरकारचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद मानला जात आहे.
“सहानुभूती नव्हे, संधी!” – या विचाराला बळ देत हा निर्णय हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणार, हे नक्की!