विधान भवनात पहिल्यांदाच ‘फेस स्कॅन’ एन्ट्री; पावसाळी अधिवेशनात छापील पास बंद

विधान भवनात पहिल्यांदाच ‘फेस स्कॅन’ एन्ट्री; पावसाळी अधिवेशनात छापील पास बंद

महाराष्ट्र वाणी 

मुंबई (प्रतीनीधी) दि २० :- महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जून २०२६ पासून मुंबईतील विधान भवनात सुरू होत असून यंदाच्या अधिवेशनात प्रवेश व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. प्रथमच छापील प्रवेशपत्रांची पद्धत बंद करून सर्वांसाठी ‘चेहरा पडताळणी’ आधारित ई-प्रवेश प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या नव्या प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

विधान भवन परिसरातील गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि सुरक्षा यंत्रणेला तपासणी प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, अधिकारी-कर्मचारी, स्वीय सहाय्यक, तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह सर्व संबंधितांसाठी ही प्रणाली अनिवार्य असेल.

यासाठी ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आवश्यक माहिती ऑनलाइन मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ई-मेलद्वारे माहिती संकलित करण्याचे काम सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे विधानमंडळ सचिवालयाने स्पष्ट केले आहे.

नव्या तंत्रज्ञानाधारित प्रवेश प्रणालीला सर्वांनी सहकार्य करावे आणि सुरक्षा व्यवस्थेला पाठबळ द्यावे, असे आवाहनही सचिवालयाने केले आहे.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी – तुमच्या परिसरापासून मंत्रालयापर्यंतच्या प्रत्येक घडामोडी सर्वात आधी!