थकबाकीदारांवर मनपाचा दणका; 12 मालमत्ता सील एका दिवसात तब्बल 54.37 लाखांचा मालमत्ताकर वसूल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :-
महानगरपालिकेने मोठ्या थकबाकीदार मालमत्ताधारकांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, आज गुरुवारी शहरातील विविध झोन कार्यालयांच्या पथकांनी दिवसभरात एकूण 12 मालमत्ता सील करून जवळपास 54.37 लाख रुपयांचा मालमत्ताकर वसूल केला.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व झोन कार्यालयांमार्फत ही कारवाई करण्यात आली.
झोननिहाय कारवाई
झोन 1 – जप्तीच्या कारवाईदरम्यान 3 मालमत्ताधारकांकडून 20.72 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन 2 – 2 मालमत्ता सील करण्यात आल्या.
झोन 3 – 2 मालमत्ताधारकांकडून 1.06 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन 4 – 3 मालमत्ता सील करण्यात आल्या.
झोन 5 – 3 मालमत्ता सील करण्यात आल्या, तर एका मालमत्ताधारकाकडून 50 हजार रुपये वसूल करण्यात आले.
झोन 6 – 1 मालमत्ता सील करण्यात आली. तसेच 2 मालमत्ताधारकांकडून 1.50 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन 7 – 1 मालमत्ता सील करण्यात आली असून, एका मालमत्ताधारकाकडून 2.39 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन 8 – 2 मालमत्ताधारकांकडून 4.01 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन 9 – एका मालमत्ताधारकाकडून 1.19 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन 10 – 2 मालमत्ता सील करण्यात आल्या.
महानगरपालिकेच्या पथकांनी केलेल्या या कारवाईत एकूण 12 मालमत्ता सील करण्यात आल्या असून, जवळपास 54.37 लाख रुपयांचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला आहे.
दर गुरुवार-शुक्रवारी धडक कारवाई
महानगरपालिकेने थकबाकीदारांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर गुरुवार आणि शुक्रवारी मोठ्या थकबाकीदार मालमत्ताधारकांवर अशाच प्रकारे जप्ती व सीलची कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ताकर तातडीने भरून जप्ती अथवा सीलसारखी अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.
दरम्यान, निवासी मालमत्तांच्या थकबाकीदारांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असून, थकीत कर न भरल्यास निवासी मालमत्तेतील एक खोली तसेच इतर स्थावर-जंगम मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित