CTPS कॉपर चोरीप्रकरणी स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशीची मागणी! ‘केवळ चोर नव्हे, तर संपूर्ण सुरक्षा साखळीचीही चौकशी करा’ : शिवसेनेचा इशारा
महाराष्ट्र वाणी
चंद्रपूर, दि. ७ ऑक्टोबर २०२६ :- चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (CTPS) मधील कोट्यवधी रुपयांच्या कॉपर केबल चोरीप्रकरणी आता केवळ चोरी करणाऱ्या आरोपींपुरती चौकशी मर्यादित न ठेवता, संपूर्ण सुरक्षा व प्रशासकीय यंत्रणेची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणासंदर्भात चंद्रपूरातील दैनिक वृत्तपत्रांमध्ये २१, २७, ३० सप्टेंबर तसेच २ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपींना अटक, ट्रक जप्ती आणि संभाव्य नेटवर्कचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, CTPSमध्ये CISF, MSF तसेच मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात असताना ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कॉपर बाहेर कसे गेले? हा मूलभूत प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपूर यांच्या वतीने महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांच्याकडे या प्रकरणी १२ मुद्द्यांवर सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
१. अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका तपासा :
चोरीच्या घटनेत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग, निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर झाली आहे का, याची चौकशी करावी.
२. CISF व MSF सुरक्षा व्यवस्थेची चौकशी :
घटनेच्या कालावधीतील गेटवरील सुरक्षा व्यवस्था, वाहन तपासणी, प्रवेश-निर्गमन रजिस्टर, गेट पास, CCTV फुटेज, ड्युटी चार्ट आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे अहवाल तपासावेत.
३. CTPSमध्ये CISF तैनातीचा आधार स्पष्ट करावा :
चंद्रपूर नक्षलग्रस्त यादीतून वगळण्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर CTPSमध्ये CISF तैनाती कोणत्या निकषांवर व कोणत्या आदेशानुसार करण्यात आली आहे, याची माहिती जाहीर करावी. संबंधित विशेष भत्ते सुरू आहेत का, याचीही स्पष्टता करावी.
४. स्वतंत्र Security Audit करावे :
CISF व MSFची सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरीचा माल वाहनातून बाहेर गेला असल्यास सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा स्वतंत्र ऑडिटद्वारे शोध घ्यावा.
५. संभाव्य संगनमताची चौकशी :
अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, कंत्राटदार, वाहन मालक-चालक किंवा बाहेरील व्यक्तींमध्ये संगनमत झाले आहे का, याचा पुराव्यांच्या आधारे तपास करावा.
६. मागील पाच वर्षांतील चोरींची चौकशी :
कॉपर, पाईप, स्क्रॅप अथवा अन्य साहित्य चोरीच्या मागील घटनांचा आढावा घ्यावा. स्टॉक रजिस्टर, मटेरियल रजिस्टर, स्क्रॅप रेकॉर्ड, गेट पास आणि पूर्वीच्या तक्रारी तपासाव्यात.
७. प्रत्यक्ष आर्थिक नुकसान निश्चित करावे :
CTPSमधील कॉपर केबलच्या उपलब्ध स्टॉकची तांत्रिक तपासणी करून नेमके किती साहित्य चोरीला गेले आणि महाजेनकोचे किती आर्थिक नुकसान झाले, याचा अहवाल तयार करावा.
८. संबंधित ट्रकची संपूर्ण माहिती तपासावी :
ट्रकचा मालक, चालक, CTPSमध्ये प्रवेशाची वेळ, कोणत्या गेटने प्रवेश झाला, परवानगी कोणी दिली, तपासणी कोणी केली आणि वाहन कोणत्या गेटने बाहेर गेले, यासह सर्व CCTV व नोंदी तपासाव्यात.
९. सुरक्षा खर्चाचे स्वतंत्र ऑडिट :
महाजेनकोकडून सुरक्षा व्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या खर्चाच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था किती प्रभावी आहे, याचे आर्थिक व सुरक्षा ऑडिट करावे.
१०. स्थानिक युवकांना रोजगाराची संधी द्यावी :
CISFची आवश्यकता व तैनातीचा आढावा घेऊन, ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक व होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
११. दोषींवर कठोर कारवाई करावी :
चौकशीत अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, कंत्राटदार किंवा अन्य कोणी दोषी आढळल्यास सेवाशिस्त व कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.
१२. चौकशीचा अहवाल जनतेसमोर आणावा :
चोरीचे प्रमाण, आर्थिक नुकसान, सुरक्षा त्रुटी, जबाबदारी निश्चिती आणि भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा.
‘केवळ आरोपींना अटक करून प्रकरण संपवू नका’
या प्रकरणात केवळ काही आरोपींना अटक करून चौकशी थांबवू नये. चोरी घडण्यासाठी कोणत्या त्रुटींमुळे संधी निर्माण झाली, सुरक्षा व्यवस्थेत कुठे चूक झाली आणि प्रशासकीय पातळीवर कोणाची जबाबदारी आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
दरम्यान, सात दिवसांत स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली नाही, तर शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या वतीने CTPSच्या मुख्य गेटसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र!
— संतोष लिलाबाई दशरथ पारखी
शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष
शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपूर