जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ८ उमेदवार बिनविरोध, ८३ जणांची माघार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल ८३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आठ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ. दिनेश परदेशी, अर्जुन गाडे, अनिल बोरसे आणि संजय निकम यांचा समावेश आहे.
२१ सदस्यीय संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून उर्वरित जागांसाठी ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. अर्ज छाननीनंतर एकूण १२० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. मात्र अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक मतदारसंघांमध्ये चित्र बदलले.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांच्या उमेदवारीवर सुरुवातीला आक्षेप घेण्यात आले होते आणि त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. मात्र अपीलनंतर त्यांचा अर्ज वैध ठरला. त्यानंतर त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय बिनविरोध झाला.
दरम्यान, काही उमेदवारांनी माघारीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनुसूचित जाती मतदारसंघातील उमेदवार दादाराव वानखेडे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
आता उर्वरित १२ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना रंगणार आहे. बिगरशेती मतदारसंघात मंत्री अतुल सावे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातील लढत विशेष चर्चेत आहे. या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची राजकीय लढत म्हणून पाहिले जात आहे.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — कारण बातमी फक्त नाही, तर सत्याचा आवाजही महत्त्वाचा!