जि.प./ पं.स. निवडणुक: मतमोजणी पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद) दि. ८ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान शनिवार दि.७ रोजी पार पडले. सोमवार दि. ९ रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.
या बैठकीस जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, तहसीलदार दिनेश झांपले तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी हे दूरदृष्टी प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील सर्व नऊ मतमोजणी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त मतमोजणीची पूर्वतयारी या संदर्भात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती सादर केली.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्वतः छत्रपती संभाजी नगर येथील मतमोजणी केंद्रावर जाऊन मतमोजणीच्या पूर्वतयारीची पाहणी केली तसेच मतमोजणी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, मतमोजणी केंद्रावरील सर्व व्यवस्था या चोख असल्या पाहिजे. तसेच मतमोजणी मतमोजणी केंद्रामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करता कामा नये, याबाबत विशेष खबरदारी घेण्यात यावी. मतमोजणी केंद्रावर माध्यम प्रतिनिधींसाठी योग्य व्यवस्था असावी. त्यांना वेळेत माहिती देण्याची सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची आहे. आकडेवारी बिनचूक देण्यात यावी, वेळेत सर्व मतमोजणी अहवाल अपलोड करावे.
पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या. प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर चौक बंदोबस्त असावा. तसेच येणारे मतमोजणी प्रतिनिधी कर्मचारी यांच्या येण्या जाण्याचे मार्ग त्यावर असणारा बंदोबस्त याबाबत त्यांनी सूचना केल्या.