छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये पोलीस पाटलांसाठी प्रथमच कर्तव्य मार्गदर्शन शिबिर; २१ जणांचा विशेष सन्मान
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी प्रथमच कर्तव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल ५७३ पोलीस पाटलांनी सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि अधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, प्रत्येक पोलीस पाटलाला त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त ठरणारी 'पोलीस पाटील कर्तव्य मार्गदर्शिका' वितरित करण्यात आली.
ग्रामीण भागात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. गावपातळीवरील वाद-विवाद, गुन्हेगारीवर नियंत्रण, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे तसेच नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रतिबंधात्मक पोलीसिंग, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता, महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलीस पाटलांनी बजावायची भूमिका याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील २१ पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पोलीस पाटील हे गाव आणि पोलीस प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे अनेक समस्या स्थानिक पातळीवरच सोडविणे शक्य होते. त्यामुळे पोलीस पाटलांनी अधिक जबाबदारीने आणि समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण पोलीस दलाच्या या अभिनव उपक्रमामुळे पोलीस पाटलांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी आणि तत्पर पोलीस सेवा मिळण्यास हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.