घाटीत मॅकेनिक बांधवांचा सेवाभाव; बेड, स्ट्रेचर, व्हीलचेअर दुरुस्त करून रुग्णसेवेत दिला हातभार

पैठण व फुलंब्रीतील मॅकेनिक संघटनांची पुढाकार; मेडिसिन विभाग, ग्रंथालय आणि अपघात विभागात मोफत सेवा

घाटीत मॅकेनिक बांधवांचा सेवाभाव; बेड, स्ट्रेचर, व्हीलचेअर दुरुस्त करून रुग्णसेवेत दिला हातभार
घाटीत मॅकेनिक बांधवांचा सेवाभाव; बेड, स्ट्रेचर, व्हीलचेअर दुरुस्त करून रुग्णसेवेत दिला हातभार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) हे मराठवाडा, खान्देश आणि विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील रुग्णांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि नातेवाईक येथे येत असल्याने रुग्णालयातील विविध सुविधा सतत वापरात असतात. या सुविधांची देखभाल आणि रुग्णसेवेला हातभार लावण्यासाठी औरंगाबाद टू व्हीलर मॅकेनिक असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर शाखेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे संस्थापक चांद सय्यद यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. रुग्णालयातील विविध विभागांमध्ये मोफत दुरुस्ती व वेल्डिंगची कामे करून आवश्यक साहित्य वापरण्यायोग्य करण्यात येत आहे.

५ जून रोजी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) सुमारे ३० खुर्च्या आणि सहा स्ट्रेचरची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर ८ जून रोजी पैठण येथील मॅकेनिक बांधवांनी मेडिसिन विभागातील २५ रुग्ण बेड, ट्रॉली, खुर्च्या आणि स्टूलची दुरुस्ती केली.

याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून १२ जून रोजी फुलंब्री येथील पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती ग्रंथालयातील ३८ खुर्च्या, अपघात विभागातील तीन स्ट्रेचर व तीन व्हीलचेअर तसेच मेडिसिन विभागातील उर्वरित १४ रुग्ण बेड दुरुस्त केले.

या उपक्रमात सदाशिव कुमावत, जनार्दन गरसुळे, महादेव महापुरे, संतोष लोहगळे, शेख नुर, चांद सय्यद यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. मध्यवर्ती ग्रंथालयातील ग्रंथपाल डॉ. संतोष शेळके, लिपिक मुराद शेख यांनीही सहकार्य केले. फुलंब्री मॅकेनिक संघटनेचे अध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष कृष्णा तुपे, विठ्ठल साबळे, साजेद मन्सुरी, अजिनाथ पवार, दिनेश भाकरे, शोहेब मन्सुरी, मुन्ना शेख, संदीप भालेकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

वाचत रहा ‘महाराष्ट्र वाणी’ — आपल्या परिसरातील सकारात्मक आणि प्रेरणादायी घडामोडींसाठी!