घरकुलांसाठी लाभार्थ्यांचा वाढता प्रतिसाद; १०५९ जणांनी भरली १० टक्के रक्कम, अर्जाला २ जूनपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील चार ठिकाणी पाच गृहप्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना घराच्या एकूण किंमतीपैकी १० टक्के रक्कम एकरकमी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. आतापर्यंत १०५९ लाभार्थ्यांनी ही रक्कम जमा केली असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी शुक्रवारी दिली.
महापालिकेकडे यापूर्वी घरकुल योजनेंतर्गत सुमारे ४० हजार ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी देण्यात आली. अर्जांची छाननी करून म्हाडाच्या धर्तीवर लकी ड्रॉ पद्धतीने सुमारे ३६०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, रक्कम मोठी असल्याने ती कमी करावी किंवा टप्प्याटप्प्याने घेण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली. तसेच उर्वरित रक्कम कशी भरायची, बँक कर्जाची प्रक्रिया काय असेल, अशा अनेक प्रश्नांमुळे सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळत होता.
या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त अमोल येडगे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि सभापती अनिल मकरिये यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी व बँक अधिकाऱ्यांचे विशेष मेळावे आयोजित करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपायुक्त अपर्णा थेटे यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
प्रकल्पनिहाय १० टक्के रक्कम भरणारे लाभार्थी :
हर्सूल – १११
पडेगाव – १२३
सुंदरवाडी – ५४८
तिसगाव गट क्र. २२५ – १३८
तिसगाव गट क्र. २२७ – १३९
एकूण लाभार्थी – १०५९
घरकूल प्रकल्पांतर्गत शहरात ११ हजारांहून अधिक घरे उभारली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यापूर्वी अर्ज केलेल्या ४० हजार लाभार्थ्यांना संधी देण्यात आली होती. मात्र, त्यापैकी केवळ ३६०० जणांची निवड झाल्याने दुसऱ्या टप्प्यात नव्याने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या टप्प्यात वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यासाठी १८ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढवून २ जूनपर्यंत करण्यात आली असून, अनामत रक्कम ४ जूनपर्यंत भरता येणार असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.
“स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांचा उत्साह वाढताना दिसत आहे.”