ग्रामीण भागातील जिद्दी मुलीची प्रेरणादायी भरारी; मुस्कान शेखची कर सहाय्यकपदी निवड
महाराष्ट्र वाणी
आष्टी दि १९ :- प्रतिकूल परिस्थिती, अनेक अडचणी आणि संघर्ष यावर जिद्द व अथक परिश्रमांच्या जोरावर मात करत भाळवणी (ता. आष्टी) येथील कु. मुस्कान जहांगीर शेख हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची कर सहाय्यक (Tax Assistant) पदावर निवड झाली असून, या यशामुळे भाळवणीसह संपूर्ण आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मुस्कानने आपल्या शैक्षणिक वाटचालीत अनेक अडथळ्यांचा सामना केला. मात्र परिस्थिती कितीही कठीण असली तरी खचून न जाता सातत्य, मेहनत आणि अभ्यासाची कास तिने सोडली नाही. तिच्या याच जिद्दीचे आणि चिकाटीचे अखेर यशात रूपांतर झाले.
मुस्कानच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आनंद व्हेज, आष्टी येथे तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि साधेपणा उपस्थितांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.
लहानपणापासूनच धडाडीच्या स्वभावाची असलेल्या मुस्कानने संघर्षाला संधी मानत आपले ध्येय गाठले. तिच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची मानसिकता महत्त्वाची ठरली.
आज तिच्या मेहनतीला यशाची पावती मिळाली असून, मुस्कानचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण आष्टी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि तरुण-तरुणींनी परिस्थितीची पर्वा न करता ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केले, तर यश मिळवता येते, हे मुस्कानने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
मुस्कान शेख हिच्या पुढील शासकीय सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिची यशोगाथा ग्रामीण भागातील अनेक युवक-युवतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.