गावठी कट्टा अन् जिवंत काडतुसे घेऊन दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; गंगापूरच्या सोलेगावात LCBची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई; ५० हजारांचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व मोबाईल जप्त
महाराष्ट्र वाणी
गंगापूर दि २१ :- गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले. स्वप्निल मनोहर उमाप (वय २६, रा. सोलेगाव, ता. गंगापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. सोलेगाव परिसरात एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगून दहशत निर्माण करत असून, त्याने गावठी कट्ट्यासह फोटो फेसबुकवरही प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून तातडीने सोलेगाव येथे रवाना केले.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीची पडताळणी करून संशयिताचा शोध घेतला. यावेळी पथकाने स्वप्निल उमाप याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला मुद्देमालासह गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, भारतीय हत्यार कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता, त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात घातक हत्यार बाळगणे, मारहाण करणे आणि धमकी देणे यासंदर्भातील गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक लहु घोडे तसेच पोहेकॉ सुनील गोरे, सचिन राठोड, गोपाल पाटील, संतोष डोंगरे, बलवीरसिंग बहुरे, योगेश तरमळे, जीवन घोलप आणि शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.