खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन; मिल कॉर्नर येथील ‘स्विमिंग पूल’चे प्रतीकात्मक उद्घाटन

"खड्डे बुजवा – नागरिक वाचवा", "रस्ते द्या, स्विमिंग पूल नको" अशा घोषणांनी परिसर दणाणला; प्रशासनाला काँग्रेसचा इशारा

खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन; मिल कॉर्नर येथील ‘स्विमिंग पूल’चे प्रतीकात्मक उद्घाटन
खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन; मिल कॉर्नर येथील ‘स्विमिंग पूल’चे प्रतीकात्मक उद्घाटन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- शहरातील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) मिल कॉर्नर येथे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांना "महानगरपालिकेचे स्विमिंग पूल" असे संबोधत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक उद्घाटन करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला.

यावेळी "खड्डे बुजवा – नागरिक वाचवा", "रस्ते द्या, स्विमिंग पूल नको" तसेच "वेलकम टू स्मार्ट सिटी" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान वाहनधारकांना गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

काँग्रेसच्या वतीने दोन आठवड्यांपूर्वीच शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेसने हे अभिनव आंदोलन छेडले.

यावेळी खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेल्या मुरूमावर पुष्प अर्पण करून त्याचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिक, वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम म्हणाले, "शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. तरीही महानगरपालिका केवळ आश्वासनांवरच वेळ मारून नेत आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी गांधीगिरीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले आहे."

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. अन्यथा आगामी काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात उपाध्यक्ष गुलाब पटेल, सरचिटणीस इंजि. विशाल बन्सवाल, दुर्गेश वैद्य, मोहम्मद जाकेर, सुरेश पवार, शेख अथर, मोईन कुरेशी, ऋषिकेश महाजन, आबेद हुसैन, रामभाऊ लोखंडे, योगेश थोरात, उमाकांत खोतकर, साहेबराव बनकर, संजय धर्मरक्षक, सरोज जेकब, अस्मत खान, सलीम पटेल, मुझफ्फर खान, ताज मोहम्मद, गणेश लहाने, नदीम सौदागर, सलीम खान, सय्यद फय्याजोद्दीन, शेख इम्रान, जकी मिर्झा, आशिष साळवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.