कट कट गेट नाल्यावरील रखडलेले स्लॅबचे काम पुन्हा सुरू; नागरिकांना दिलासा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- जुन्या शहरातील कट कट गेट परिसरातील नाल्यावरील स्लॅबचे काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रखडले होते. काम बंद असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
नाल्याचे काम अपूर्ण अवस्थेत राहिल्याने या ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले होते. परिणामी परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत होता. तसेच नागरिकांच्या नियमित ये-जा करण्यावरही याचा परिणाम झाला होता.
या समस्येकडे लक्ष वेधून संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर प्रशासनाने दखल घेत नाल्यावरील स्लॅबचे रखडलेले काम पुन्हा सुरू केले आहे.
कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, काम केवळ सुरू न ठेवता ते निर्धारित वेळेत पूर्ण करून परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रखडलेले काम पुन्हा मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.