कट कट गेटवर महावितरणचा भोंगळ कारभार; नवीन DP धोकादायक अवस्थेत, रस्त्यावर विद्युत तारा

कट कट गेटवर महावितरणचा भोंगळ कारभार; नवीन DP धोकादायक अवस्थेत, रस्त्यावर विद्युत तारा
कट कट गेटवर महावितरणचा भोंगळ कारभार; नवीन DP धोकादायक अवस्थेत, रस्त्यावर विद्युत तारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- कट कट गेट परिसरात महावितरणच्या कामाच्या दर्जावर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर जुनी विद्युत DP हटवून नवीन DP बसवण्यात आली. मात्र नवीन DP उभारण्यासाठी करण्यात आलेल्या बांधकामाच्या स्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, DP साठी करण्यात आलेल्या बांधकामाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे हे बांधकाम कितपत मजबूत आहे, याबाबत शंका व्यक्त केली जात असून, DP कोसळण्याचा धोका असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय DP बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही परिसरातील कामकाज व्यवस्थितपणे आवरले गेले नसल्याचा आरोप आहे. कट कट गेट परिसरातील रस्त्यावर विद्युत तारा पडलेल्या अवस्थेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांनी यापूर्वीच धोकादायक विद्युत व्यवस्थेबाबत महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नवीन DP बसवण्यात आली; मात्र नवीन व्यवस्थेमुळे समस्या सुटण्याऐवजी सुरक्षिततेबाबत नवीन प्रश्न निर्माण झाल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.

DP चे बांधकाम कमकुवत राहिले किंवा रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारांमुळे दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महावितरण प्रशासनाने या ठिकाणी तातडीने पाहणी करून DP च्या बांधकामाची सुरक्षितता तपासावी, आवश्यक असल्यास बांधकाम मजबूत करावे आणि रस्त्यावर असलेल्या विद्युत तारा सुरक्षित पद्धतीने व्यवस्थित कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे