एच. जे. थीम महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅली; तिरंगा प्रतिज्ञेने देशभक्तीचा जागर

एच. जे. थीम महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅली; तिरंगा प्रतिज्ञेने देशभक्तीचा जागर

महाराष्ट्र वाणी 

जळगाव दि १९ :- इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाबद्दल सन्मानाची भावना वृद्धिंगत करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन करून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तिपर घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला.

रॅलीदरम्यान ‘हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा’, ‘तिरंगा हमारी शान, भारत हमारी जान’, ‘एक तिरंगा, एक पहचान—मेरा भारत महान’, ‘तिरंगे का मान बढ़ाएँ, हर घर तिरंगा फहराएँ’ अशा घोषणांतून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि नागरिक कर्तव्यांचा संदेश देण्यात आला.

प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा तसेच देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.

यानंतर महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सामूहिकरित्या प्रतिज्ञा घेत राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे, देशाची एकता व अखंडता जपणे, राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याचा संकल्प केला.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला देशभक्तीमय वातावरण लाभले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिक कर्तव्यांची जाणीव अधिक दृढ झाली.