आता क्रांती चौकातच ‘जंतर-मंतर’! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डाव्या लोकशाही आघाडीचे आंदोलन
SIR प्रक्रिया रद्द करा, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; पोलीस दडपशाही आणि विद्यार्थी-युवकांच्या अटकेचाही निषेध
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- दिल्लीतील जंतर-मंतरच्या धर्तीवर आता छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातही आंदोलनाचा आवाज घुमला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागण्यांसाठी डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
मतदार याद्यांतील कथित फेरफाराचा मुद्दा ऐरणीवर
मतांची चोरी, मतदार याद्यांमध्ये कथित फेरफार, पात्र मतदारांची नावे वगळणे, बोगस मतदारांची नोंदणी आणि ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत उपस्थित होणारे प्रश्न या मुद्द्यांवर देशभरात आंदोलन सुरू असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर क्रांती चौकातही जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडण्यात आली.
पोलीस दडपशाही आणि अटकेच्या घटनांचा निषेध
दिल्लीसह देशाच्या विविध भागांत होत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या पोलीस दडपशाहीचा आंदोलकांनी निषेध केला. विविध आंदोलनांदरम्यान विद्यार्थी आणि युवकांना अटक केल्याच्या घटनांवरही नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना आपली भूमिका मांडण्याचा तसेच शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. या अधिकारांचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.
रेल्वे आणि बससेवा बंद केल्याचा आरोप
दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे आणि बससेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करत आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासात अडथळे निर्माण करणे म्हणजे त्यांच्या घटनात्मक अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नागरिकांना शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली.
विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी सहभागी
या आंदोलनाला काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, स्वराज अभियानचे साथी सुभाष लोमटे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड भगवान भोजने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, जगन्नाथ काळे, शहराध्यक्ष सय्यद अक्रम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अभय टाकसाळ, लाल निशाण पक्षाचे भीमराव बनसोड, मराठवाडा शिक्षक संघाचे भाई चंद्रकांत चव्हाण, सीटूचे लक्ष्मण साक्रुडकर, एसएफआयचे अरुण मते, एआयएसएफचे अनंता कराळे, एमएसएमआरएचे श्रीकांत फोपसे, अॅड. सचिन गंडले, प्रकाश पाटील, भाऊसाहेब झिरपे, डॉ. लोकेश कांबळे, समाधान बारगळ, मनीषा बल्लाळ, रखमाजी कांबळे, आरती लांडगे, सम्यक जमधडे, लाल बावटा रिक्षाचालक युनियनचे शेख अमजद शेख पाशु, राजू हिवराळे, रफिक बक्ष, शेख एजाज, समाधान पारधे, मराठवाडा लेबर युनियनचे अॅड. सुभाष सावंगीकर, स्वराज अभियानचे साथी शेख खुर्रम, प्रा. प्रकाश शिरसाठ आणि तिलोत्तमा झाडे यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलनाची सांगता झाली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित