"स्वतः चे घर स्वतः चे ताब्यात "या मोहिमे अंतर्गत २५ हजार घरांचे बांधकाम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश"

"स्वतः चे घर स्वतः चे ताब्यात "या मोहिमे अंतर्गत २५ हजार घरांचे बांधकाम १५ ऑगस्टपर्यंत  पूर्ण करा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश"

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18, :- "स्वतः चे घर स्वतः चे ताब्यात "या मोहिमे अंतर्गत २५ हजार घरांचे बांधकाम १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले. सोबत जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, रमाई शबरी, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना तसेच १५० दिवस मुख्यमंत्री कार्यक्रम व वृक्ष लागवड जलसंधारण जल पुनर्भरण आदी योजनाची अंबलबजावणी देखील गतीने करा असे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक यांच्याकडून विविध योजनांचा आढावा घेतला. 

विभागीय आयुक्त श्री. पापळकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुलांची कामे 15 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करून संबंधितांना घरकुल वाटप करण्यात यावे तसेच उर्वरित घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण होतील, याबाबत नियोजन करावे. तसेच विभागातील योजना निहाय नियमितपणे आढावा घेत प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणी बाबत सुक्ष्म नियोजन करुन प्रलंबित योजनांचा लाभ पात्र लाभार्थीपर्यंत पोहचावा. असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्वयंसहायता समुह स्थापना, ग्रामसंघ स्थापना, प्रभागसंघ स्थापना, स्वयंसहायता समुहांना फिरता निधी वाटप, आर्थिक प्रगती, स्वयंसहायता समुहांना बँक कर्ज वाटप तसेच आर्थिक प्रगती व भौतीक प्रगती, उत्पादक गट स्थापना, "लखपती दिदी योजनेबाबतही आढावा घेत योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत विहित कालमर्यादेत पोहचावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मंजुर व पूर्ण घरकुले, सर्व राज्य पुरस्कृत आवास योजना (रमाई, शबरी, पारधी, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजनांचाही आढावा घेत पात्र लाभार्थीना घरकूल योजनांचा लाभ वेळेत देण्याबाबत नियोजन करा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जलजीवन मिशन सर्वकष योजना, लघु पाटबंधारे जिल्हा परिषद योजनांचा आढावा, जिल्हा वार्षीक योजना कोल्हापुरी बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसविणे दुरुस्ती व पाणी अडविण्याबाबतही योजनांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण, तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामांसाठी विशेष अनुदान, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम आढावा, स्थानिक विकास निधी कार्यक्रम आढावा, जि.प. स्तरावरील मंजूर कामे, शासन स्तरावरीत मंजूर कामांबाबतही आढावा घेण्यात आला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच 15 वा वित्त आयोग राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, ग्रामपंचायत कर वसुली, एक दिवस गावक-यांसोबत उपक्रम या उप्रकमासह शाळा खोली बांधकाम, आदर्श शाळा खोली बांधकाम, सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत आर्थिक प्रगती आढावा, सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत अपूर्ण कामाचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेत याबाबत कामांना गती द्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागा अंतर्गत योजना तसेच आर्थिक भौतिक, मागासवर्गीय निधी खर्च, ग्रामपंचायत स्वसंपादीत उत्पन्नातून मागासवर्गीय कल्याणासाठी 15 टक्के निधीचा आढावा, स्थानिक स्वराज्य संस्था स्वसंपादीत उत्पन्नातुन दिव्यांग कल्याणासाठी 5 टक्के निधी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मॉडेल गावे स्थिती, वैयक्तिक शौचालय बांधकाम आणि अनुदान वितरणाची स्थिती, सार्वजनीक शौचालय बांधकाम प्रगती, शक्ती संचार पोर्टल प्रणाली महासंचार पोर्टलवरील प्रलंबित परवानगी अर्जाच्या निर्गतीबाबतचाही आढावा यावेळी घेण्यात आला. केंद व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणी बाबतचे नियोजन करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळाला पाहीजे, असे नियोजन करा, असे निर्देशही विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी दिले.

बैठकीस सर्व जिल्ह्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच अपर आयुक्त आस्थापना, सहाय्यक आयुक्त विकास व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.