सिल्लोडमध्ये खत-बियाण्यांचा काळाबाजार?; शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात ठाकरे सेनेचे निवेदन

सिल्लोडमध्ये खत-बियाण्यांचा काळाबाजार?; शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात ठाकरे सेनेचे निवेदन

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड ( प्रतिनिधी) दि ५ :- : तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांमार्फत खत व बियाण्यांची शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक किमतीत विक्री होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पेरणी हंगाम जवळ येत असताना काही कृषी सेवा केंद्रांकडून खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असलेली खते मिळवण्यासाठी इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी जीएसटीसह अधिकृत बिले न देता केवळ साध्या पावत्यांवर व्यवहार होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

कृषी विभागाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि संबंधित कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून खत-बियाण्यांच्या साठ्याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच युरियासोबत अन्य खतांची सक्ती करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.

निवेदन सादर करताना तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, माजी तालुकाध्यक्ष अजित पाटील, विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, शिवसेना नेते संजय कळात्रे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडे, प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर, शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे, उपशहर प्रमुख किशोर लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

👉 शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.