समाजाला झटणारे कार्यकर्ते घडवा – बबनराव घोलप यांचे आवाहन
महाराष्ट्र वाणी.Com
दि ३ जून - पुणे (प्रतिनिधी – शंकर जोग)
राष्ट्रीय चर्मकार महासंघाची राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवनात संपन्न झाली. या बैठकीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत समाजातील विविध ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बबनराव घोलप म्हणाले, "समाजाला आज तुमची गरज आहे. आळशीपणा झटकून समाजासाठी झटणारे कार्यकर्ते घडवले पाहिजेत. आपण समाजाचे काही देणे लागतो, यासाठीच या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे."
पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या भागात सक्रिय राहून समाजजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी बबनराव घोलप यांनी राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. नवीन कार्यकारिणीत भानुदास विसावे, ज्ञानेश्वर कांबळे, रवींद्र खैरे, शशिकांत सोनवणे, अशोक माने, भाऊसाहेब कांबळे व नारायण कुटे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, महिला अध्यक्षा सरोज बिसुरे, प्रवक्ता रवींद्र राजुस्कर, सल्लागार उर्मिला ठाकरे, उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे तसेच राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.