संजय राऊत यांच्या हस्ते भारतीय कर्मचारी संघाच्या राज्य संमेलनाचे उद्घाटन; रोहित पवार, नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ नोव्हेंबरला आयोजन; संविधान, लोकशाही, आरक्षण आणि कामगारांच्या प्रश्नांवर होणार मंथन
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ :- भारतीय कर्मचारी संघ (BKS), भारतीय स्वाभिमानी संघ (BSS) आणि विविध सहयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या महाराष्ट्र राज्य संमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. पडेगाव येथील राजयोग मंगल कार्यालय, चिनार गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे. संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, शिक्षण, आरक्षण आणि कामगारांच्या प्रश्नांसह बहुजन समाजासमोरील विविध आव्हानांवर या संमेलनात विचारमंथन होणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन खासदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. याशिवाय भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रशिक्षण राज्य प्रमुख अॅड. राहुल मखरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारतीय कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. ओहोळ, भारतीय स्वाभिमानी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. एन. रेकवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. भारतीय स्वाभिमानी संघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात SIR प्रक्रिया, डिलिमिटेशन बिल आणि EVM मशीनमधील कथित घोटाळ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. हे मुद्दे भारतीय संविधान आणि लोकशाहीसमोरील आव्हानांच्या दृष्टीने तपासले जाणार आहेत. तसेच जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून आरक्षणाचे प्रश्न सोडवता येतील का आणि बहुजनांचे राजकीय पक्ष फोडण्यामागे RSS व BJPची काय भूमिका आहे, या विषयांवरही विचारमंथन होणार आहे.
दुपारच्या सत्रात पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, सरकारी शाळांचे खासगीकरण, मुस्लिम समाजाबाबत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या भूमिकेतील कथित विरोधाभास तसेच बहुजन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ट्रेड युनियन चळवळीची आवश्यकता या विषयांवर चर्चा होईल.
कर्मचारी-कामगारांचे प्रश्न, शिक्षणव्यवस्थेतील आव्हाने, सामाजिक समता, आरक्षण आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण याबाबत संघटनात्मक भूमिका अधिक बळकट करण्याचा संमेलनाचा प्रयत्न असणार आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही या माध्यमातून व्यक्त केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून कर्मचारी, कामगार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत. संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाहीचे बळकटीकरण आणि सामाजिक न्यायासाठी संघटित चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या राज्य संमेलनाला महाराष्ट्रातील नागरिक, कर्मचारी-कामगार, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित