वैजापूर खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई! मुख्य आरोपीसह १६ जण जेरबंद; एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही घेतले ताब्यात

वैजापूर खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई! मुख्य आरोपीसह १६ जण जेरबंद; एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही घेतले ताब्यात

वैजापूर दि ९ :- शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन रोहित पठारे यांचा मृत्यू झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आल्याने या कारवाईला वेग आला आहे.

वैजापूर शहरात गणेशोत्सव २०२६ च्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये वाद झाला होता. या वादातून झालेल्या मारहाणीत रोहित पठारे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच पोलीस पथकांकडून शोधमोहीम

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांची पाच पथके आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आंतरजिल्ह्यात लपून बसलेल्या आरोपींचा माग काढला.

या मोहिमेदरम्यान ९ नोव्हेंबर रोजी आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) अविनाश ऊर्फ अनिकेत पोपट होंड

२) ज्ञानेश्वर सिताराम वडाळकर

३) प्रतीक कैलास साळुंके

४) रोहित मच्छिंद्र आहेर

५) संकेत आदिनाथ आहेर

६) तुषार आदिनाथ आहेर

सर्व आरोपी वैजापूर येथील रहिवासी आहेत. याशिवाय एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

आतापर्यंत १६ आरोपी अटकेत

या खून प्रकरणात यापूर्वी आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९८/२०२६ मध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. अशा प्रकारे यापूर्वी दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर नव्याने सहा जणांना अटक करण्यात आल्याने आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १६ झाली आहे. एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा वैजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक लहुजी घोडे, भारत निकाळजे, रामेश्वर ढाकणे, युवराज पाडळे तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित