२८ वर्षांची परंपरा कायम! आमदार अब्दुल सत्तारांनी मानलेल्या बहिणीच्या घरी साजरी केली भाऊबीज; रक्ताच्या नात्यापलीकडील स्नेहबंधाची भावनिक कहाणी!
सावखेड्यात गोंगे परिवारासोबत भाऊबीजेचा आनंद; राजकीय व्यस्ततेतही जपली आपुलकीची अनोखी परंपरा
सिल्लोड (प्रतिनिधी) दि ११ :- राजकारणाच्या धावपळीत अनेक नाती मागे पडतात, मात्र काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होत जातात. रक्ताचे नाते नसतानाही प्रेम, विश्वास आणि आपुलकीच्या बळावर निर्माण झालेल्या अशाच एका अनोख्या नात्याची प्रचिती सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. गेल्या तब्बल २८ वर्षांपासून जपलेली मानलेल्या बहिणीच्या भेटीची परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवत सावखेडा येथे भाऊबीज साजरी केली.
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील आपल्या मानलेल्या भगिनी सौ. भागीरथीबाई धनजी पा. गोंगे यांच्या निवासस्थानी आमदार अब्दुल सत्तार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीजेचा सण साजरा केला. गेल्या २८ वर्षांपासून राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणीची भेट घेण्याचा हा स्नेहबंध त्यांनी आजही तितक्याच आत्मीयतेने जपला आहे.
राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील व्यस्ततेतून वेळ काढत या जिव्हाळ्याच्या नात्याला प्राधान्य देणे, हीच या भेटीची खासियत ठरली. यावेळी भागीरथीबाईंनी औक्षण करून भावाला रुमाल, टोपी व कपड्यांची भेट दिली. तर आमदार सत्तार यांनी बहिणीला साडी भेट देत तिचे आशीर्वाद घेतले. यावेळी गोंगे परिवारातील सदस्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत दीपावली, पाडवा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.
रक्ताचे नाते नसले तरी प्रेम, विश्वास आणि आपुलकीच्या धाग्यांनी विणलेले हे नाते गेल्या २८ वर्षांपासून अधिकाधिक घट्ट होत आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून जपली जाणारी ही परंपरा म्हणजे नात्यांमधील जिव्हाळा आणि माणुसकीचे सुंदर उदाहरण असल्याची भावना या भेटीतून व्यक्त झाली.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, सद्दाम पटेल, धनजी पा. गोंगे, काशिनाथ गोरे, बाळासाहेब गोरे, प्रताप शेळके, प्रकाश तायडे, कैलास फुके, जितेंद्र तांबे, काशिनाथ तांबे, रघुनाथ तांबे, रामदास भोजने, डॉ. भाऊसाहेब गोंगे, समाधान गोंगे यांच्यासह गोंगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित