‘५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी होणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांसाठी मोठा मोर्चा काढणार!
वैजापूर दि ३ :- अतिवृष्टी, दुष्काळ, पीक विमा, नुकसानभरपाई आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून, जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदतही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे का, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यभरात मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
वैजापूर तालुक्यातील गारज आणि कन्नड तालुक्यातील जेहूर येथे आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन सोयाबीन, तूर, मूग आणि कापूस या पिकांची अवस्था जाणून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, आर्थिक नुकसान आणि सरकारी मदतीबाबतच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
‘मुलींना दिवाळीसाठी माहेरी कसे आणायचे?’ शेतकऱ्याची भावनिक व्यथा
गारज येथील तरुण शेतकरी कडुबा त्रिभुवन यांनी शेतीतील नुकसानीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाची व्यथा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली. शेतीतून उत्पन्नच मिळाले नसताना मुलींची दिवाळी कशी करायची, त्यांना सणासाठी माहेरी कसे आणायचे, असा हृदयद्रावक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुलींना माहेरी आणण्याचीही भीती वाटत असल्याचे सांगताना या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाची व्यथा मांडली. सरकारची पाच हजार रुपयांची मदत म्हणजे 'लबाडाचे आवतन' असल्याची टीकाही शेतकऱ्यांनी केली.
पीक विमा, नुकसानभरपाई अन् कर्जमाफीचे प्रश्न कायम
मागील वर्षाचा पीक विमा, अतिवृष्टीची नुकसानभरपाई आणि जाहीर करण्यात आलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही प्रत्यक्ष कर्जमाफी मिळत नसल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी मांडल्या.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्ष मदतीच्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांची निराशा होत आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, तर या सरकारच्या घोषणांचा उपयोग काय, असा सवाल ठाकरे यांनी केला.
कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींचा खर्च; शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा!
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. दुष्काळावर केवळ घोषणा करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत पोहोचवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा. त्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोठा मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, बाबासाहेब मोहिते, बबन जाधव, रमेश सावंत, मनाजी पाटील मिसाळ, संजय मोटे, मनोज गायके, संजय निकम, कल्याण चव्हाण, भरत मिसाळ, सतीश जिवरख, बाळासाहेब बडक, धर्मराज दानवे, विठ्ठल डमाळे, उमेश मोकासे, अक्षय साठे, योगेश पवार, हरिष पाटील, महिला आघाडीच्या पद्मा शिंदे व अर्चना सोमासे यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | जनतेच्या हक्काचा प्रश्न