जन्मदाखल्यासाठी पालिकेच्या फेऱ्या संपणार! आता रुग्णालयातूनच तीन दिवसांत मिळणार प्रमाणपत्र
नवजात बालकाच्या पालकांना मोठा दिलासा; जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार रुग्णालयांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना
मुंबई दि १८ :- नवजात बालकाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची आणि तासनतास प्रतीक्षा करण्याची गरज आता संपणार आहे. पालकांचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी जन्मदाखला देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून, आता बाळाचा जन्म झालेल्या संबंधित रुग्णालयातूनच अवघ्या तीन दिवसांत जन्मप्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
रुग्णालयातूनच मिळणार जन्मदाखला
नव्या सुविधेमुळे पालकांना जन्मदाखल्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात स्वतंत्र अर्ज करण्याची किंवा वारंवार पाठपुरावा करण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाला आहे, त्याच रुग्णालयातून तीन दिवसांच्या आत जन्मदाखला मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णालयांना नोंदणीचे अधिकार
या प्रक्रियेला गती देण्यासाठी जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयांना स्वतंत्र लॉग-इन आयडीदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालय स्तरावरच जन्माची नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित