सत्कारातून मिळाली नवी ऊर्जा! पदवीधर, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार – डॉ. प्रतापसिंह पाटील

शिऊर येथे नवनिर्वाचित आमदारांचा सन्मान; ८५ हातमागांचे अनुदानावर वितरण, गोशाळेचे उद्घाटन

सत्कारातून मिळाली नवी ऊर्जा! पदवीधर, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार – डॉ. प्रतापसिंह पाटील
सत्कारातून मिळाली नवी ऊर्जा! पदवीधर, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार – डॉ. प्रतापसिंह पाटील

शिऊर, ता. वैजापूर दि ५ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे जीवन विकास विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारातून मिळालेले प्रोत्साहन पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार आणि युवकांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याची नवी ऊर्जा देणारे असल्याची भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना त्यांनी पदवीधरांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांनी आयोजकांसह उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीकृष्ण अभयतीर्थ गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून ९० टक्के अनुदानावर मंजूर झालेल्या ८५ हातमागांचे बंधू-भगिनींना वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक कारागिरांना रोजगाराची संधी मिळण्याबरोबरच आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार नामदेवराव पवार, कार्यक्रमाचे संयोजक तथा सेवानिवृत्त उद्योग संचालक जे. के. जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, पांडुरंग तांगडे, केशवराव तायडे, एकनाथराव जाधव, अर्जुन पाटील गाढे, डॉ. प्रशांत अवसरमल, भाऊसाहेब काळे, श्रीमंत उकिरडे, विनायक गवळी, प्रवीण मिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय, युवकांना रोजगार आणि स्थानिक कारागिरांना स्वावलंबनाची संधी मिळवून देण्याच्या दिशेने आपण कटिबद्ध असल्याचा निर्धार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित