मनोज जरांगे पाटील यांच्याकडून नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा सन्मान!
पदवीधर मतदारसंघातील विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा; सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ६ :- मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्याबद्दल डॉ. पाटील यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान दोघांमध्ये सामाजिक, शैक्षणिक तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवर स्नेहपूर्ण चर्चा झाली. विशेषतः पदवीधर युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा, शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सन्मानाबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठवाड्यातील पदवीधर मतदारांनी दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक आणि शिक्षण क्षेत्रातील घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठविणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
"मराठवाड्यातील पदवीधरांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. विद्यार्थी, युवक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांचा शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेला सन्मान आणि दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत," अशी भावना डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
या सदिच्छा भेटीमुळे सामाजिक प्रश्न, शैक्षणिक विकास आणि युवकांच्या भवितव्याबाबत सकारात्मक चर्चा घडून आली. मनोज जरांगे पाटील यांच्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल व शुभेच्छांबद्दल डॉ. पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित