दिवाळीनंतर अतिक्रमण हटावचा पुन्हा धडाका! मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेचा ॲक्शन प्लॅन

दिवाळीनंतर अतिक्रमण हटावचा पुन्हा धडाका! मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेचा ॲक्शन प्लॅन
दिवाळीनंतर अतिक्रमण हटावचा पुन्हा धडाका! मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेचा ॲक्शन प्लॅन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काही काळ स्थगित ठेवण्यात आलेली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम आता पुन्हा सक्रिय होणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने अशा ठिकाणांना प्राधान्य देत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेसाठी पोलिसांची मदतही घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

यापूर्वी महापालिकेने चंपाचौक ते रोशनगेट या मार्गावरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला होता. मात्र, या भागात अद्याप फुटपाथचे काम पूर्ण झालेले नसल्याने पुन्हा अतिक्रमणे वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, दमडी महल ते कटकटगेट या मार्गावर अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ६० टक्के मालमत्ताधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली आहेत. मात्र, उर्वरित ४० टक्के अतिक्रमणे अद्याप कायम असल्याने या भागातही पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, भडकलगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय या महत्त्वाच्या व्हीआयपी मार्गावरही महापालिकेने मार्किंग करून संबंधित मालमत्ताधारकांना अतिक्रमणे हटविण्याचा इशारा दिला आहे. नवीन विकास आराखड्यानुसार या रस्त्याची रुंदी पाच मीटरने वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही मालमत्ताधारकांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सुरुवातही केली होती.

मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम तात्पुरती थांबविण्यात आली. आता सण संपल्याने महापालिका प्रशासन पुन्हा कारवाईच्या तयारीत आहे. मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करण्यावर भर दिला जाणार असल्याने शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित