जनगणना २०२७ ची तयारी सुरू; २५ जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणना! अचूक माहिती संकलनाला सर्वोच्च प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
नागरिकांना स्वगणनेचाही पर्याय; जिल्ह्यात ५,३१७ प्रगणक आणि ७३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ :- देशाच्या जनगणना २०२७ साठी प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, येत्या २५ जानेवारी २०२७ पासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेत नागरिकांना वेब पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची माहिती नोंदविण्याची अर्थात स्वगणनेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. जनगणनेचे काम अचूक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्रगणकाने माहिती संकलनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजेच घरयादी व घरगणनेची प्रक्रिया एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आली असून, आता दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लोकसंख्या गणनेचे काम पार पडणार आहे. त्यानंतर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत फेरतपासणी केली जाईल. विशेष म्हणजे, १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना वेब पोर्टलवरून स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात ५,३१७ प्रगणक आणि ७३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, तालुकानिहाय प्रशिक्षणासाठी १०६ प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत. या सर्वांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणासाठी जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सुनील आत्राम आणि जनगणना अन्वेषक मयूर पवार यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले की, जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून, त्यातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे भविष्यातील विकासाचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची आणि नागरिकांची माहिती अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. या जनगणनेत एकूण ४० प्रश्न विचारले जाणार असून, कोणतीही माहिती चुकीची नोंदवली जाणार नाही, याची प्रत्येक प्रगणकाने दक्षता घ्यावी. तसेच संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित