मोहल्ल्यांपाठोपाठ आता शहरातील उद्यानांमध्येही पुस्तकांची शाळा! ‘बुक हँगर’ अभियानाचा शुभारंभ; राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात
Read & Lead Foundationचा अभिनव पुढाकार; शहरातील प्रत्येक रविवारी एका उद्यानात पुस्तकांचे दालन, मुलांसाठी सामूहिक वाचनाचा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३१ :- मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना मोबाईल आणि स्क्रीनच्या वाढत्या वापरापासून काही काळ दूर ठेवून पुस्तकांच्या ज्ञानविश्वाशी जोडता यावे, या उद्देशाने Read & Lead Foundationने आणखी एक अभिनव पाऊल उचलले आहे. फाउंडेशनच्या ‘बुक हँगर अभियानाचा’ शुभारंभ दैनिक लोकमतचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते लोकमत कार्यालयात करण्यात आला. यावेळी त्यांनी मुलांसाठी स्वतःकडून पुस्तके भेट देत ‘पुस्तके वाचा, ज्ञान वाढवा; वाचतील मुले तर घडतील मुले’ असा प्रेरणादायी संदेश दिला.
मुलांच्या हातात पुस्तके देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत राजेंद्र दर्डा यांनी यावेळी व्यक्त केले. केवळ पुस्तकांची उपलब्धता पुरेशी नसून मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणारे वातावरणही निर्माण झाले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.
Read & Lead Foundationच्या वतीने यापूर्वी ‘मरियम मिर्जा मोहल्ला बाल पुस्तकालय अभियान’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत चार शहरांमध्ये एकूण ६७ बाल पुस्तकालये कार्यरत आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ४२, परभणी येथे १५, मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे ५ आणि हैदराबाद येथे ५ पुस्तकालयांचा समावेश आहे. या माध्यमातून मुलांपर्यंत पुस्तकांचा खजिना पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
आता प्रत्येक रविवारी एका उद्यानात वाचनाचा उपक्रम!
मोहल्ल्यांमधील पुस्तकालयांच्या यशानंतर आता फाउंडेशनने सार्वजनिक उद्याने आणि पार्कांमध्ये ‘बुक हँगर लायब्ररी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी हे प्रत्येक रविवारी शहरातील एका निवडक उद्यानात जाऊन पुस्तकांचे हँगर उभारणार आहेत. या ठिकाणी उद्यानात येणाऱ्या मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच सुमारे एक तास सामूहिक वाचनाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे उद्यानांमध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना मनोरंजनासोबतच ज्ञान आणि संस्कारांची शिदोरी मिळणार आहे. मोबाईल, टीव्ही आणि डिजिटल स्क्रीनच्या वाढत्या आकर्षणाच्या काळात मुलांना पुन्हा पुस्तकांकडे वळविण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.
इमारत नको, जागा नको; पुस्तकांची उपलब्धता हाच खरा पुस्तकालयाचा पाया!
पुस्तकालय उभारण्यासाठी मोठी इमारत किंवा भाड्याची जागा असणे आवश्यक नाही. जिथे पुस्तके उपलब्ध आहेत आणि वाचण्याची इच्छा आहे, तिथे पुस्तकालय निर्माण होऊ शकते, हा विचार Read & Lead Foundation आपल्या उपक्रमातून प्रत्यक्षात आणत आहे.
मोहल्ल्यांपासून सार्वजनिक उद्यानांपर्यंत विस्तारत असलेली ही वाचन चळवळ शहरातील बालवाचकांची नवी पिढी घडविण्यास निश्चितच हातभार लावणारी ठरू शकते.
Read & Lead Foundationचा संदेश – ‘किताबों से रोशन हर घर!’
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित