२५ वर्षे भाजपाची सत्ता, पण मंदिर विकासासाठी काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराने घेतला पुढाकार!- आमदार नितीन देशमुख
अकोला दि १८ :- अकोलेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासाचा मुद्दा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या २५ वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाकडे असतानाही मंदिराच्या विकासासाठी ठोस पावले का उचलण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेसचे मुस्लिम आमदार साजिद खान पठाण यांनी श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. मंदिराचा विकास आराखडा तयार करणे तसेच मंदिराचा 'ब वर्ग तीर्थक्षेत्र' यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा मुद्दा पुढे करत नितीन देशमुख यांनी भाजपाच्या २५ वर्षांच्या राजकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
'२५ वर्षे सत्ता उपभोगली, मात्र अकोलेकरांच्या आराध्य दैवताच्या मंदिराच्या विकासासाठी काय केले?' असा थेट सवाल आमदार देशमुख यांनी भाजपाला केला. ज्या मंदिराच्या विकासासाठी भाजपाला इतक्या वर्षांत ठोस पुढाकार घेता आला नाही, त्याच कामासाठी काँग्रेसच्या एका मुस्लिम आमदाराने शासनदरबारी पाठपुरावा केला, ही बाब भाजपाच्या राजकीय दाव्यांचा विचार करण्यास भाग पाडणारी असल्याचे त्यांनी म्हटले.
श्री राजराजेश्वर मंदिर हे अकोला शहरातील नागरिकांच्या श्रद्धेचे आणि धार्मिक अस्मितेचे महत्त्वाचे केंद्र आहे. मंदिराचा विकास आराखडा तयार होणे आणि ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणे, यामुळे मंदिराच्या पायाभूत सुविधांसह धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या विषयाकडे केवळ धार्मिक नव्हे, तर शहराच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही पाहणे आवश्यक आहे.
मंदिराच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत आमदार नितीन देशमुख यांनी भाजपाच्या दीर्घकालीन राजकीय प्रतिनिधित्वाचा हिशेब मागितला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अकोला पश्चिममधील भाजपाच्या मागील २५ वर्षांच्या कार्यकाळात धार्मिक स्थळांच्या विकासासाठी नेमके काय प्रयत्न झाले, तसेच श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासाला गती देण्यासाठी पुढे कोणती पावले उचलली जाणार, यावर राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.