महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही! रोहित पठारे हत्या प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात
वैजापूरबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्याची मागणी
वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) वि १७ :- रोहित पठारे यांच्या निर्घृण हत्येवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, अशी टीका करत या प्रकरणाचा तपास वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. वैजापूरबाहेरील अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वैजापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, रोहित पठारे यांची ज्या निर्घृण आणि अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचा तीव्र निषेध करतो. संतोष देशमुख हत्याकांडाप्रमाणेच पठारे यांचाही बळी गेला आहे. मदतीची मागणी करूनही पोलीस प्रशासनाकडून वेळीच प्रतिसाद मिळाला नाही, ही गंभीर बाब आहे. तपासातील त्रुटी, CCTV फुटेज आणि मोबाईलमधील व्हिडिओंबाबतची माहिती लपवली जात असल्याचा आरोप करत न्यायालयानेही तपासावर लक्ष ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईतील SRA प्रकल्पात एक लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या (SRA) नावाखाली मोकळ्या आणि सरकारी जागांवर इमारती उभारण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. SRA प्रकल्पातील प्रीमियम बुडविल्यामुळे सरकारचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान, तर ६० हजार कोटी रुपयांचा अवैध भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला. एकूण एक लाख कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी. या विभागाची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचेही ते म्हणाले.
‘अदानी तुमचा जावई लागतो का?’
पाटण तालुक्यातील पंप स्टोरेज प्रकल्पावरूनही सपकाळ यांनी सरकारला लक्ष्य केले. वनविभागाची परवानगी नसल्याने प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले असून संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. मग इतके दिवस सरकार काय करत होते? असा सवाल त्यांनी केला. ‘अदानी तुमचा जावई लागतो का, तुमचा बाप लागतो का?’ असा आक्रमक सवाल करत भूकंपप्रवण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील सह्याद्रीच्या भागात आवश्यक परवानग्या आणि वन्यजीव सुरक्षेची मंजुरी न घेताच काम सुरू असल्याचा आरोप केला. उद्योगपती राज्य चालवत आहेत, मुख्यमंत्री नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
एअर इंडिया इमारतीच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह
एअर इंडियाची इमारत १,६०० कोटी रुपयांना खरेदी करून तिच्या दुरुस्तीसाठी आणखी ४०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन हजार कोटी रुपये खर्च करूनही नवीन इमारत उभारता आली असती. खरेदीपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज का घेण्यात आला नाही? हा व्यवहार करण्यामागील कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आधी काँग्रेसच्या दहा प्रश्नांची उत्तरे द्या!
SIR संदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेसला सहा प्रश्न विचारल्याच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, त्यांनी आधी ते सहा प्रश्न स्पष्टपणे मांडावेत. काँग्रेस प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. मात्र, काँग्रेसने उपस्थित केलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारीही त्यांनी ठेवावी. सहा प्रश्न विचारण्यापूर्वी काँग्रेसच्या दहा प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यास विरोध
दुष्काळी परिस्थितीमुळे नागपूरऐवजी मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या चर्चेवरही सपकाळ यांनी नाराजी व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी झालेल्या नागपूर करारानुसार मुंबईला राजधानी आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला असून एक अधिवेशन नागपुरात घेण्याचे निश्चित झाले होते. या कराराचे पालन करणे हा सरकारचा राजधर्म आहे. दुष्काळामुळे खर्च वाचविण्यासाठी नागपूरचे अधिवेशन मुंबईत घ्यायचे असेल, तर मुंबईत अधिवेशन घेतल्याने खर्च होत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर, शहराध्यक्ष अक्रम सय्यद, राजाभाऊ देशमुख, जगन्नाथ काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित