जालन्यातील दहा एकर जमिनीवरून मालकी हक्काचा वाद; सातबाऱ्यावर शासनाची नोंद, दुरुस्तीसाठी वारसदारांची मागणी
प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न प्रलंबित; न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा सय्यद अकबर यांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ९ : जालना शहरातील महापालिका हद्दीत असलेल्या गट क्रमांक २५५/१/१ मधील दहा एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शासनाच्या नावाची नोंद करण्यात आली असून, ही नोंद चुकीची असल्याचा दावा मूळ जमीन मालक आयेशाबी सय्यद सरवर यांच्या वारसदारांनी केला आहे. सातबारा उताऱ्यावरील शासनाच्या नावाची नोंद रद्द करून मूळ मालकाचे नाव नोंदविण्याची मागणी वारसदारांनी केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना आयेशाबी सय्यद सरवर यांचे वारसदार सय्यद अकबर यांनी सांगितले की, सन १९७६ मध्ये कौसर शेख पिता मिन्हाज शेख यांच्याकडून आयेशाबी सय्यद यांनी संबंधित दहा एकर जमीन खरेदी केली होती. या व्यवहाराचे खरेदीखत, जमिनीचा नकाशा, दाखला तसेच जुन्या सातबारा उताऱ्यासह मालकी हक्क सिद्ध करणारी कागदपत्रे उपलब्ध आहेत. ही सर्व कागदपत्रे संबंधित शासकीय कार्यालयांकडे सादर करण्यात आली आहेत.
मात्र, अलीकडे नवीन सातबारा उतारा काढल्यानंतर त्यावर शासनाच्या नावाची नोंद असल्याचे समोर आले. त्यामुळे मूळ मालकाच्या वारसदारांनी या नोंदीवर आक्षेप घेत दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वारंवार अर्ज करून पाठपुरावा सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत १९ ऑगस्ट २०२६ रोजी जालना तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. १५ जुलै २०२६ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने प्रकरणाची सुस्पष्ट शिफारस आणि आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले होते. अहवाल सादर करण्यास विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल, असेही तहसीलदारांनी पत्रात स्पष्ट केले होते.
मात्र, कागदपत्रांसह वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप सातबारा उताऱ्यावरील नोंदीत दुरुस्ती झालेली नसल्याने वारसदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे योग्य निर्णय घ्यावा आणि सातबारा उताऱ्यावर मूळ मालकाच्या नावाची नोंद करावी, अशी मागणी सय्यद अकबर यांनी केली.
प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात येईल. तेथेही समाधानकारक निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृहात दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत सय्यद अकबर यांनी ही माहिती दिली. यावेळी शेख बरकत उपस्थित होते. संबंधित जमिनीच्या मालकी हक्काबाबत योग्य ती चौकशी करून नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित