नगरसेवकांची अपात्रता प्रकरणे पुन्हा रखडली! सहा जणांची मुदतवाढीची मागणी, सुनावणीसाठी नव्या तारखा बातमी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ : महापालिकेतील नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रकरणांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. सुनावणीच्या प्रत्येक टप्प्यावर नगरसेवकांकडून मुदतवाढ मागितली जात असल्याने ही प्रक्रिया वारंवार पुढे ढकलली जात आहे. सोमवारी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सात नगरसेवकांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेतली. मात्र, त्यापैकी सहा नगरसेवकांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितल्याने त्यांना पुढील सुनावणीसाठी २१ डिसेंबर ही तारीख देण्यात आली. तर विरोधी पक्षनेते अब्दुल समीर यांच्या प्रकरणाची सुनावणी २८ डिसेंबर रोजी होणार आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांपासून सुनावणीच्या वेळी मुदतवाढ मागण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे अपात्रतेच्या तक्रारींचा अंतिम निकाल कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या तब्बल २५ नगरसेवकांविरोधात अपात्रतेच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची प्रशासकीय स्तरावर छाननी केल्यानंतर आयुक्तांकडून सुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
आतापर्यंत सुनावणीचे जवळपास चार टप्पे पार पडले आहेत. मात्र, वारंवार मागितल्या जाणाऱ्या मुदतवाढीमुळे अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणांचा निकाल लागण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.