दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; राज्यातील तलावांचे होणार खोलीकरण!
मुंबई दि १९ :- राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळाच्या संकटावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील तलावांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या कामांसाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार आहे. तलावांमधील गाळ काढणे, तलावांची साठवण क्षमता वाढवणे तसेच स्थानिक नाले आणि जलस्रोतांचे खोलीकरण करण्यासाठी या यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे.
राज्यातील अनेक तलावांमध्ये वर्षानुवर्षे गाळ साचल्याने त्यांच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. हा गाळ काढून तलाव अधिक खोल केल्यास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणे शक्य होऊ शकते. त्याचबरोबर नाल्यांचे खोलीकरण केल्याने पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यास मदत होईल. परिणामी भूजलपातळीत सुधारणा होण्यासह शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याची अपेक्षा आहे.
मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी सुरू होणार, राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना आणि तालुक्यांना प्रथम प्राधान्य मिळणार, तसेच या कामांसाठी किती यंत्रसामग्री तैनात केली जाणार, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाकडे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.