अनधिकृत बांधकामांना नोटीस, धोकादायक होर्डिंग हटविणार; आयुक्त अमोल येडगेंचे कडक निर्देश!
वाहतुकीला अडथळा ठरणारे व धोकादायक होर्डिंग तातडीने हटविणार; बीपीएमएस प्रणालीद्वारे बांधकाम परवानग्यांची होणार तपासणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास शास्तीवर १०० टक्के सूट देण्याच्या योजनेचा शहरात व्यापक प्रचार करून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील अवैध प्लॉटिंग, अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक होर्डिंगविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी (दि. १७ नोव्हेंबर) सहाय्यक आयुक्त, इमारत निरीक्षक, नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्तांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
थकीत मालमत्ता कराची एकरकमी रक्कम भरणाऱ्या नागरिकांना शास्तीवर १०० टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून कर वसुलीला गती द्यावी, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच मालमत्ता कराच्या दुबार नोंदींची पडताळणी करून नियमानुसार त्या वगळण्याचे निर्देशही देण्यात आले.
अवैध प्लॉटिंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने नियमित लक्ष ठेवावे. असे प्रकार आढळताच संबंधितांना नोटीस बजावून बांधकाम तातडीने थांबवावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नियमांनुसार नियमित करता येणाऱ्या इमारतींची प्रक्रिया पूर्ण करावी, तर नियमित करणे शक्य नसलेल्या बांधकामांवर नियमानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, प्लॉटिंग आणि निर्माणाधीन इमारतींना अधिकृत परवानगी आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी बीपीएमएस (BPMS) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात सहाय्यक आयुक्त आणि इमारत निरीक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
धोकादायक होर्डिंगवरही कारवाई
शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि जाहिरात फलकांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे आणि अपघाताचा धोका असलेले होर्डिंग तातडीने हटविण्याची कारवाई करावी, असे आयुक्तांनी सांगितले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, संतोष वाहूळे, नगररचनाकार कौस्तुभ भावे, उपायुक्त सविता सोनवणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित