शेतवस्तीवरील घरफोडीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, एक आरोपी जेरबंद, 1.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ जून :- पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील शेतवस्तीवर झालेल्या घरफोडीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपीनाथ माणीक मोरे (वय 44, रा. विहामांडवा शिवाजीनगर, ता. पैठण) यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 18 एप्रिल 2026 रोजी रात्री ते आपल्या शेतवस्तीवरील घरात कुटुंबासह झोपले असताना 19 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते जागे झाले. त्यावेळी दोन अज्ञात इसम घराजवळून पळून जाताना दिसले.
घराची पाहणी केली असता सोन्याच्या बाळ्या, वेल, नथ, सोन्याचे मणी, मोबाईल फोन आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, ही चोरी उदया मजल्या भोसले (वय 45, रा. टाकळी अंबड, ता. पैठण) आणि त्याचा साथीदार राजेश उर्फ हिंदीवाला दिलीप पवार (रा. वाळूज) यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे 30 मे 2026 रोजी विहामांडवा-टाकळी अंबड मार्गावरील पुलाजवळ सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी मोटारसायकलवरून येत असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागे बसलेला आरोपी राजेश पवार पोलिसांची चाहूल लागताच उसाच्या शेतात पळून गेला. तर मोटारसायकल चालवत असलेला उदया भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत उदया भोसले याने आपल्या साथीदारासह सदर घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून 48 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाळ्या, 3 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी तसेच गुन्ह्यात वापरलेली 80 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 1 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीस पाचोड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, सचिन राठोड, सुनील गोरे तसेच बलबीरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांच्या पथकाने केली.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे विश्वासार्ह अपडेट