शेंद्रा-बिडकीन बायपासला वेग! मंत्री अतुल सावे यांचे सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

शेंद्रा-बिडकीन बायपासला वेग! मंत्री अतुल सावे यांचे सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १३ :– शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार आणि शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीतील नव्या उद्योगांची संभाव्यता लक्षात घेता, शेंद्रा-बिडकीन बायपास रस्त्यास नव्या रस्ता जोडण्यासह सुधारीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश राज्याचे इमाव कल्याण व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

या रस्त्याच्या कामकाजावर आढावा घेण्यासाठी आज मंत्री सावे यांनी बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक संघर्ष मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ऑरिक सिटी प्रकल्पाचे पदाधिकारी उपस्थित होते.

३५ किमी लांबीचा हा बायपास रस्ता २०१७ पासून प्रस्तावित असून, या प्रकल्पाची पूर्तता होईपर्यंत शहराचा विकास व उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. त्यामुळे हा मार्ग केवळ एक बायपास न राहता, धुळे-सोलापूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, वाळूज औद्योगिक वसाहत, अहिल्यानगर व पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांशी जोडणे आवश्यक असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

तसेच पूर्वेकडील जालना ड्रायपोर्ट आणि पश्चिमेकडील वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बायपास मार्गावर मालवाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढेल. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तातडीने सुधारीत प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश मंत्री सावे यांनी दिले.