शहागंज प्रकरण तापले! एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; आयुक्त जी. श्रीकांत यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.५ :- शहागंज येथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करून शिवीगाळ व धमकावल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भातील अहवाल लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार असून संबंधित नगरसेवकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शहागंज परिसरातील रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरू असताना एमआयएमचे काही नगरसेवक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. या वेळी शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रारही करण्यात आली. घटनेत काही नगरसेवकांचे नातेवाईकही सहभागी असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात 11 नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाईकांसह सुमारे 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यानंतर नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
व्हिडिओ आणि रीलही पुरावा
या घटनेशी संबंधित व्हिडिओ फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्सही तपासात महत्त्वाचे पुरावे ठरणार असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. काही नगरसेवकांनी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो असा दावा केला आहे, तर काहींनी कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
इतर तक्रारींचीही चौकशी सुरू
महापालिका निवडणुकीनंतर काही नगरसेवकांविरोधात विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात तीन अपत्याचा नियम, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण तसेच उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचे आरोप यांचा समावेश आहे. या सर्व तक्रारींची स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाचे आरोप फेटाळून लावले. “शहरातील लाखो मतदारांनी आम्हाला निवडून दिले आहे. शहागंज येथील अतिक्रमण कारवाई आम्ही अडवली नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला शिवीगाळ केली नाही. आम्ही केवळ नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला,” असे ते म्हणाले. महापौर किंवा आयुक्तांनी कायदेशीर कारवाई केल्यास त्याला कायद्याच्या चौकटीत उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
— ‘महाराष्ट्र वाणी’
शहरातील राजकीय घडामोडींचे अचूक अपडेट्स मिळवत राहा…