बनेवाडीत महापालिकेची धडक मोहीम; अनधिकृत नळधारकांना ८ दिवसांचा अल्टिमेटम

कनेक्शन नियमित करा, अन्यथा थेट कायदेशीर कारवाई; पोलीस बंदोबस्तात कारवाई

बनेवाडीत महापालिकेची धडक मोहीम; अनधिकृत नळधारकांना ८ दिवसांचा अल्टिमेटम
बनेवाडीत महापालिकेची धडक मोहीम; अनधिकृत नळधारकांना ८ दिवसांचा अल्टिमेटम

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अनधिकृत नळ जोडण्यांवर आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने बनेवाडी परिसरात धडक कारवाई मोहीम राबविली. या मोहिमेमुळे अनधिकृत नळ कनेक्शनधारकांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाने संबंधितांना आठ दिवसांची अंतिम मुदत देत कडक इशारा दिला आहे.

महानगरपालिकेने या कारवाईसाठी यापूर्वीच पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, उपनिरीक्षक नामदेव सुपे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे अधिकारी व विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या मोहिमेत सहाय्यक अभियंता मिलिंद भामरे, पथक प्रमुख रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अमित पंडागळे, विक्रांत सावंत, सुमित बोराडे तसेच अनधिकृत नळ कनेक्शन शोध व निर्मूलन पथकाने सक्रिय सहभाग घेतला.

कारवाई सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या आदेशानुसार आणि माजी नगरसेवक अब्दुल मतीन खान यांच्या विनंतीनंतर नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तात्पुरती कारवाई स्थगित केली. मात्र, ही केवळ अंतिम संधी असल्याचे स्पष्ट करत पुढील आठ दिवसांत सर्व अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनी आवश्यक संचिका तयार करून आपले कनेक्शन नियमानुसार अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दिलेल्या मुदतीत कनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून पाणीपुरवठा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. :::

वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडींचे विश्वसनीय अपडेट!