वैजापूरमध्ये खळबळ! राजस्थानमधील मजुराची हत्या करून मृतदेह जाळला; दोन आरोपी जेरबंद

वैजापूरमध्ये खळबळ! राजस्थानमधील मजुराची हत्या करून मृतदेह जाळला; दोन आरोपी जेरबंद
वैजापूरमध्ये खळबळ! राजस्थानमधील मजुराची हत्या करून मृतदेह जाळला; दोन आरोपी जेरबंद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर/वैजापूर दि १९ :- वैजापूर ते शिर्डी महामार्गालगत बेलगाव शिवारात बाहेर राज्यातील एका मजुराची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी जलद तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

१७ जून रोजी बेलगाव शिवारातील पडीत शेतात झुडपांमध्ये जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मोबाईलमधील फोटोच्या आधारे चौकशी केली असता मृत व्यक्तीचे नाव सिताराम सज्जनलाल बावरी (वय ३०, रा. रुपाहेलीकला, ता. हुरडा, जि. भिलवाडा, राजस्थान) असल्याचे समोर आले.

सिताराम बावरी हे ब्लास्टिंगचे काम करत होते आणि मागील काही दिवसांपासून बेलगाव परिसरात विहीर खोदाईच्या कामावर होते. १५ जूनच्या रात्री ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे राहुल उर्फ कुणाल पप्पू कुंभारकर (वय १८) आणि ऋषिकेश उर्फ सोनू अजय त्रिभुवन (वय २३) यांना ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत आरोपींनी धक्कादायक कबुली दिली. त्यांनी सांगितले की, १५ जूनच्या मध्यरात्री पैशांसाठी त्यांनी सिताराम बावरी यांना अडवून मारहाण केली. पैसे न दिल्याने त्यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पडीत शेतात नेले आणि लाथाबुक्क्यांसह सुबाभळीच्या लाकडाने बेदम मारहाण करून हत्या केली.

यानंतर मृताची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर लाथा मारून पँटमधील ३५० रुपये लुटले. त्यानंतर मृतदेहावर वाळलेला चारा, गवत आणि कपडे टाकून पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त केला असून पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

🔹 गुन्हा कितीही गंभीर असला तरी कायद्याच्या हातातून आरोपी सुटत नाहीत, हे या कारवाईने पुन्हा सिद्ध झाले.