"झाल्टा फाट्यावर MD ड्रग्जसह दोघे जेरबंद; ग्रामीण पोलिसांची 7.39 लाखांच्या मुद्देमालासह मोठी कारवाई"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. १७ :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 62.27 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडरसह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत वाहन, मोबाईल, वजनकाटा आणि रोख रक्कम असा एकूण 7 लाख 39 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी झाल्टा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.
15 जून रोजी सायंकाळी झाल्टा फाटा येथे बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित कार (MH 14 HU 0639) अडवून तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान वाहनातून 62.27 ग्रॅम मेफेड्रोन पावडर आढळून आली. या पदार्थाची किंमत सुमारे 2 लाख 49 हजार 80 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अर्जुन मिट्टी साबळकर (वय 28, रा. पाचोड, ता. पैठण) आणि नरेश मांगीलाल बिश्नोई (वय 29, मूळ रा. जालोर, राजस्थान, सध्या पाचोड) अशी आहेत.
या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8(c), 22(c) व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, महसूल विभागाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि FSL पथकाच्या उपस्थितीत केली.
👉 अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचत राहा – महाराष्ट्र वाणी.