खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना जिन्सी पोलिसांचा दणका; राज्याबाहेर पसार होण्यापूर्वीच तिघे जेरबंद
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि १८ :- खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्यात जिन्सी पोलिसांना मोठे यश आले आहे. राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक करण्यात आली. यापूर्वीच या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ८ जून २०२६ रोजी युसूफ खान रऊफ खान (वय ४५, व्यवसाय ऑटो चालक, रा. जुना बायजीपुरा, गंजेशहिदा मस्जिदजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेतील जखमी शाहरूख शकील खान (वय ३०, रा. बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, १५ जून रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) (खून) ची भर घालण्यात आली.
तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी गुन्ह्यातील इतर आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार समीर शरीफ शहा (वय १९, रा. रहीमनगर) याला १७ जून रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध सुरू असताना जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश ताठे यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी माजिद शफी खान (वय २७, रा. रहीमनगर) आणि मोहम्मद अक्रम अब्दुल रहेमान (वय २७, रा. चिस्तिया कॉलनी, सिडको) हे शरणापूर फाटा परिसरात असून तेथून राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांना तातडीने पथकासह रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या दोघांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (सिडको विभाग) मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे तसेच परिमंडळ-२ मधील तपास पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुणा घुले करत आहेत.
वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ – आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह अपडेट!