बिडकीन DMIC मध्ये ‘टाटा स्टील’ची दमदार एंट्री! मंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नांना यश; छत्रपती संभाजीनगर बनणार देशाचे नवे EV हब
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १९ :- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, बिडकीन डीएमआयसी (Delhi-Mumbai Industrial Corridor) परिसरात आता ‘टाटा स्टील’सारखी मोठी कंपनी गुंतवणूक करणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे आणखी एका कोरियन कंपनीकडूनही या भागात उद्योग उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बिडकीन डीएमआयसीची वाटचाल देशातील महत्त्वाच्या EV (इलेक्ट्रिक वाहन) हबकडे होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
उद्योगांसाठी जमिनीची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेत ८ हजार एकर जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी २ हजार एकर जमीन लघु व मध्यम उद्योगांसाठी, तर उर्वरित ६ हजार एकर जमीन मोठे उद्योग आणि गृहनिर्माण प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या निवास आणि सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत.
दरम्यान, शेंद्रा ते वाळूज रस्त्याच्या कामालाही मंजुरी मिळाली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. या रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच शेंद्रा–बिडकीन–ढोरेगाव या पुणे महामार्गाला जोडणाऱ्या औद्योगिक रस्त्याच्या अलायनमेंटचे कामही अंतिम टप्प्यात असून, मंजुरीनंतर पुढील दोन-तीन दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या रस्त्यामुळे शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या तिन्ही महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती थेट पुणे महामार्गाशी जोडल्या जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
"बिडकीनमध्ये उद्योगांची पावले पडू लागली, आता विकासाचा वेगही झपाट्याने वाढणार!"