एका दिवसात 1149 वाहनचालकांवर कारवाई; ₹13.84 लाखांचा दंड, हेल्मेट न वापरणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई

एका दिवसात 1149 वाहनचालकांवर कारवाई; ₹13.84 लाखांचा दंड, हेल्मेट न वापरणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई
एका दिवसात 1149 वाहनचालकांवर कारवाई; ₹13.84 लाखांचा दंड, हेल्मेट न वापरणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस प्रशासनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवत एकाच दिवसात 1149 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत ₹13 लाख 84 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, हेल्मेटचा वापर न करणे, भरधाव वेग, राँग साईडने वाहन चालविणे, स्टंटबाजी आणि निष्काळजीपणे वाहन चालविणे ही प्राणघातक अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले.

सन 2025 मध्ये जिल्ह्यात 846 रस्ते अपघात झाले. त्यापैकी 481 प्राणघातक अपघातांमध्ये 538 जणांचा मृत्यू झाला, तर 344 गंभीर अपघातांमध्ये 455 जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, 342 दुचाकी अपघातांमध्ये 357 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जानेवारी ते मे 2026 या कालावधीतही अपघातांचे प्रमाण चिंताजनक राहिले असून 398 अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये 240 दुचाकी अपघातांमध्ये 144 जणांचा मृत्यू झाला असून 121 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर 8 जून 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या सहभागाने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.

कारवाईचा तपशील

विना हेल्मेट – 563

सिग्नल जंपिंग/पोलीस आदेशाचे पालन न करणे – 132

विना लायसन्स – 89

वाहतुकीस अडथळा – 61

ट्रिपल सीट – 51

विना सीट बेल्ट – 30

ओव्हरस्पीड – 15

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे – 8

फॅन्सी नंबर प्लेट – 14

धोकादायक ओव्हरटेक – 14

18 वर्षांखालील मुलांकडून वाहन चालविणे – 1

इतर कलमांखाली – 184

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर जीव वाचविणारे सुरक्षा कवच असल्याचे सांगितले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

👉 तुमचा हेल्मेट तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षिततेची हमी आहे; नियम पाळा आणि अपघात टाळा!