FDAचा ‘एनर्जल’वर मोठा घाव!; छत्रपती संभाजीनगरात 20.78 लाखांचा साठा जप्त

दोन दिवसांत दुसरी धडक कारवाई; 36 हजारांहून अधिक बाटल्या ताब्यात, चुकीच्या ब्रँडिंगवर FDAचा बडगा

FDAचा ‘एनर्जल’वर मोठा घाव!; छत्रपती संभाजीनगरात 20.78 लाखांचा साठा जप्त

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरात आणखी एक मोठी कारवाई करत 20 लाख 78 हजार 676 रुपयांचा ‘एनर्जल’ (ENERZAL) पेयाचा साठा जप्त केला आहे. अवघ्या दोन दिवसांत करण्यात आलेली ही दुसरी धडक कारवाई असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मंगळवारी (ता. 2) FDAच्या पथकाने करोडी परिसरातील मे. एफडीसी लिमिटेड कंपनीच्या गोदामाची तपासणी केली. या तपासणीत ‘आरटीएस फ्रूट बेव्हरेज एनर्जी अँड इलेक्ट्रोलाइट (ENERZAL)’ या पेयाच्या 400 मिली क्षमतेच्या तब्बल 36 हजार 468 बाटल्या साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

तपासणीदरम्यान संबंधित उत्पादनाच्या लेबलिंग व ब्रँडिंगमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या पत्रानुसार हे उत्पादन ‘मिसब्रँडेड’ म्हणजेच चुकीचे लेबलिंग किंवा ब्रँडिंग असलेले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर FDAने तात्काळ कारवाई करत संपूर्ण साठा जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 20 लाख 78 हजार 676 रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर आणि पी. पी. सुरसे यांनी केली. तर सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील आणि सहआयुक्त एस. आर. करकले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहीम राबविण्यात आली.

FDAने ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.

📦 दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत सलग दोन मोठ्या कारवाया करून नियमभंग करणाऱ्यांमध्ये धडकी भरवली आहे. प्रतिबंधित व नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तपासण्या आणि कारवायांचा वेग वाढविण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

👉 ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर FDAचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरूच; पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.