महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी निकष निश्चित; नागरिकांना मिळणार परिवहन सेवा घराजवळ

महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी निकष निश्चित; नागरिकांना मिळणार परिवहन सेवा घराजवळ

महाराष्ट्र वाणी

मुंबई (प्रतिनिधी) दि १६ :- राज्यातील वाढती वाहनसंख्या, नागरिकांच्या वाढत्या गरजा आणि परिवहन प्रशासनावरील वाढता ताण लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक (RTO) व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने निकष निश्चित केले आहेत. नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

यासाठी परिवहन विभागाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यातील शिफारसींना तत्त्वतः मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे दुर्गम तसेच वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांतील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन तपासणी, कर भरणा आणि इतर सेवांसाठी दूरच्या कार्यालयांवर जाण्याची गरज कमी होणार आहे.

नवीन कार्यालय स्थापन करण्यासाठी वाहनसंख्या, लोकसंख्या, महसूल, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यांसारखे निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात किमान चार तालुके, पाच लाखांहून अधिक वाहने, सात लाखांहून अधिक लोकसंख्या आणि वार्षिक 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल असणे आवश्यक राहणार आहे.

तसेच विद्यमान परिवहन कार्यालयापासून 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पूर्ण कार्यालयाची आवश्यकता भासणार नाही, त्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (ATS) आणि स्वयंचलित वाहन चालक चाचणी केंद्र (ADTT) उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील परिवहन सेवा अधिक परिणामकारक, सुलभ आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या हक्काच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी!