NEET 2026 साठी प्रशासन सज्ज! छत्रपती संभाजीनगरात 50 केंद्रांवर 17,734 विद्यार्थी देणार परीक्षा

ड्रोनद्वारे देखरेख, विशेष बस सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था; जिल्हाधिकाऱ्यांचे समन्वयाचे निर्देश

NEET 2026 साठी प्रशासन सज्ज! छत्रपती संभाजीनगरात 50 केंद्रांवर 17,734 विद्यार्थी देणार परीक्षा
NEET 2026 साठी प्रशासन सज्ज! छत्रपती संभाजीनगरात 50 केंद्रांवर 17,734 विद्यार्थी देणार परीक्षा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १७ :- राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) 2026 ही 21 जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 50 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सज्ज झाले आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत परीक्षेच्या नियोजनासह सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील 50 केंद्रांपैकी 47 केंद्रे शहरात तर 3 केंद्रे ग्रामीण भागात आहेत. यंदा एकूण 17 हजार 734 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

दुपारी 2 ते 5.15 या वेळेत परीक्षा होणार असून प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र केंद्र निरीक्षक, दंडाधिकारी आणि पोलीस बंदोबस्त अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरावर ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानक व बसस्थानकांवरून महानगरपालिकेच्या विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि मदत केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्रांबाहेर उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी व उपस्थिती नोंदविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेआधी केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवेशपत्रावरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करून परीक्षा यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश दिले.

या बैठकीला पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, संतोष गोरड, विजय चव्हाण, प्रवीण फुलारी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर तसेच महावितरण विभागाचे अधिकारी आणि परीक्षा समन्वयक उपस्थित होते.

📢 महाराष्ट्र वाणी | शिक्षण, प्रशासन आणि जनहिताच्या ताज्या घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा!