स्मार्ट मीटर सक्तीने बसवू नका; अन्यथा तीव्र आंदोलन – शहर काँग्रेसचा महावितरणला इशारा

स्मार्ट मीटर सक्तीने बसवू नका; अन्यथा तीव्र आंदोलन – शहर काँग्रेसचा महावितरणला इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या वीज मीटरसंदर्भातील विविध समस्यांवरून छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केले. नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

निवेदनात शहरातील नागरिकांना वीज मीटरशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन वीज मीटर मिळण्यात होणारा विलंब, खराब अथवा बंद पडलेले मीटर वेळेत बदलून न देणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज बिले तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब काँग्रेसने निदर्शनास आणून दिली.

महावितरण ही नागरिकांच्या मूलभूत गरजांशी निगडित सेवा असल्याने ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, सदोष मीटर तात्काळ बदलून द्यावेत, चुकीच्या वीज बिलांची चौकशी करून दुरुस्ती करावी, प्रलंबित मीटर जोडणी अर्ज निकाली काढावेत तसेच प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक आर्थिक भार टाकणे योग्य नाही. प्रशासनाने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

निवेदन सादर करताना शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्यासह ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण, शेख अथर, डॉ. पवन डोंगरे, इंजि. विशाल बन्सवाल, आमेर अब्दुल सलीम, मोहम्मद जाकेर, मोहसीन खान, मोईन कुरेशी, योगेश थोरात, शेख नवीद, शफीक शहा, इरफान पठाण, नदीम सौदागर, शेख जमील, शब्बीर पटेल, मुदस्सिर अन्सारी, शेख जहीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

— वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’; जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा विश्वासार्ह आढावा!